मोहोळच्या इतिहासाला उजाळा देते वाघमोडे- देशमुख गढी

 मोहोळच्या इतिहासाला उजाळा देते वाघमोडे- देशमुख गढी- : इसवी सन १६५९ मध्ये चार एकर जागेत बांधलेल्या प्रशस्त गढीला ३६७ वर्षे लोटली आहेत. इ. स. सन १६५२ मध्ये शहाजीराजे भोसले यांच्या परगण्यात सरदार म्हणून काम पाहणारे धनगर समाजाचे विठोजी बाबाजी देशमुख यांनी शहाजी राजांचा पुण्याचा कारभार इमानेइतबारे केला. निष्ठेचे फळ म्हणून त्यांना मोहोळ परिसरातील १६० खेड्यांचा कारभार व परगण्यातील ३ हजार ६०० एकर जमीन इनाम देऊ केले. त्याच काळात इ. स. १६५९ मध्ये चार एकर जागेत उभारलेली हि गढी. 
विठोजी देशमुख यांच्या आठव्या पिढीचे सध्याचे वारस अण्णासाहेब बाळासाहेब देशमुख हे आहेत. या गढीची माहिती देताना ते इतिहासात रमले. या गढीच्या रक्षणासाठी बारा रामोशांची नेमणूक होती. विठोजी देशमुखांना ५ हजार सैन्यांची फौज दिली होती. या फौजेचे काम परिसरातील बाराबलुतेदारांच्या हातात होते. अक्कलकोट, नळदुर्ग, सांगलीचे वरेकर-देशमुख यांच्या मदतीला हि फौज अनेक वेळा गेली होती. तुळजापूरची आई भवानी व पंढपूरचा विठोबा या देवस्थानाची देखभाल याच फौजेकडे होती. पुढे १६५५ च्या दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका चकमकीत विठोजी देशमुख मारले गेले. साळाबाईंच्या कार्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. 
राज्याभिषेकानंतर त्यांनी साळाबाईंना पालखी व दोन उंटांचा नजराणा मान म्हणून पाठविला. त्या भेटीचा दगडी शिलालेख आजहि साळाबाईंच्या मंदिरासमोर पाहायला मिळतो. या गढीतून कोळेगावपर्यंत सुमारे सहा किलोमीटर लांबीचे भुयार सीना नदीच्या परिसरात बांधण्यात आले होते. गढीच्या आतील बाजूस धनधान्य जाऊन ठेवण्यासतही असलेल्या मोठमोठ्या चार तळघरांचा वापर अण्णासाहेब बाळासाहेब देशमुख आजही करतात. सन १७१५ च्या काळात साळाबाई यांचे निधन झाले. त्यांच्या पालखीची गादी व तलवार आजही गढीत असून दरवर्षी विजयादशमीला पूजेसाठी काढली जाते. पुढे इ. स. १८१८ च्या काळात आष्टी येथे मराठेशाहीची शेवटची लढाई झाली. फितुरीत या गढीची नासधूस करण्यात आली. आता गढीची देखभाल देशमुख घराण्याचे वंशज अण्णासाहेब बाळासाहेब देशमुख हे करीत आहेत. दहा- पंधरा वर्षांपूर्वी पडलेल्या या गढीचा त्यांनी जीर्णोद्धार केला. 
गढीचे दरवाजे सागवान व सिसम लाकडापासून बनविलेले आहेत. मुख्य द्वार बंद कारण्यासाठी 'आगळ' बसविला जायचा, तो आजही दिसतो. गढीच्या पूर्वेला उर्दू व कन्नड भाषेतील शिलालेख असून, त्याची शिळा जमिनीखाली पाच फुटांपर्यंत आहे. तेथे असलेल्या कमानीवर हा शिलालेख  असून त्या खाली एक  दगडाची पाचर काढल्यास पूर्ण गढीची इमारतच ढासळते, असे सांगण्यात येते. 

 माहिती साभार- लोकमत वृत्तपत्र, सोलापूर ग्रामीण (दि. १९ मे २०१९)

Post a Comment

0 Comments