आठवणीतील " वाडा " - सुखवास्तु

" वाडा "..हा शब्द मनाच्या अगदीच जवळचा आहे, कारण वाड्यात आम्ही घडलोय, वाढलोय.. आज आमचा वाडा हयात नाही, किंबहुना आम्ही त्याचे जतन करू शकलो नाही याची खंत आहेच तरी सुद्धा त्याचे वर्णन, तिथल्या आठवणी आणि काही फोटो आम्ही सांभाळून ठेवले आहे, त्याविषयीची माझा खलील लेख..

सुखवास्तू ■   
          
तुळशी वृंदावनावर तेवणाऱ्या  दिव्याचा प्रकाश समोरील स्वयंपाकघराच्या भिंतीवर पडला होता. भल्यामोठ्या उंच तुळशी वृंदावनावरील दिवाही त्याला शोभेल असाच मोठा होता. स्वयंपाकघर व वृंदावन या मधील अंगणात बसून आजी आम्हाला कालिया मर्दनाची गोष्ट आगदी रंगवून सांगत होती. आम्ही भावंडंही ती ऐकण्यात तल्लिन झालो होतो. "आणि कृष्णाने असा जोरदार टोला कलियाच्या फण्यावर मारला.... फट्ट!"
तशी त्या फट्टनीशी  मला जाग आली. वास्तवात भान आले खरे पण मन काही भूतकाळातून बाहेर येईना, आणि मन:चक्षू वर तो अगदी जशास तसा उभा राहिला.
                 माझ्या माहेरी, विदर्भातील रिसोड या गावी तो दिमाखात उभा होता. साधारण १५००० चौ. फुटात बांधलेला, भक्कम मजबूत असा, तीन ताळ चोवीस खोल्या असलेला, भव्य प्रवेशद्वार असलेला, कोरीव कमानीनी सजलेला, सागवानी  लाकडाचे दारं - खिडक्या व माळवद असलेला असा तो "वाडा". होय, वाडा ही दोन अक्षरी ओळखच त्याच्यासाठी पुरेशी होती.
                 वाड्याच्या प्रवेशालाच तीन भलेमोठे दगडी फाड्यांनी बांधलेले ओटे होते. व्हरांडे नव्हे, अगदी ५०-५०माणसं ही सहज सामावले जातील असे भले मोठे ओटे. पहिल्या व दुसऱ्या ओट्याच्या मध्ये मुख्य वाड्यात प्रवेश देणारे उंच, भक्कम असे प्रवेशद्वार होते. तपकिरी रंगाचे मजबूत लाकडी असे हे प्रवेशद्वार ' मोठे दार ' म्हणून ओळखले जात असे. मोठा कडिकोंडा असलेले, अधिक सुरक्षा म्हणून लाकडी नाटीची आगळ असलेले हे मोठे दार  लहान मुले व किरकोळ प्रकृतीच्या लोकांना सहज लोटले जात नसे. हे मोठे दार म्हणजे वाड्याची शान होते.
                 मोठ्या दारातून आता प्रवेश केल्यावर साधारण १०-१२ पाऊलांवर एक विस्तीर्ण अशी दगडी कमान होती. मोठ्या दाराच्याच  रुंदीची. दार व कमान या दोहोंमध्ये पूर्व व पश्चिमेला दोन मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. एका खोलीत वाड्याच्या मुनिमजिंचे दप्तर होते व दुसऱ्या खोलीचा वापर गडी माणूस किंवा तत्सम कोणी भेटायला आल्यास त्यांना बसण्यासाठी होत असे. या दोन्ही खोल्या तसेच दार ते कमान या सगळ्यांवर मिळून सलग असे दोन  मजले होते. सर्वात वरच्या मजल्याला ' तिसरा ताळ ' असे म्हंटले जाई. तिसऱ्या ताळावर मोठ्या लोखंडी ट्रंकांमध्ये गौरी - गणपती, बैलपोळा असे कधीतरीच वर्षातून एखादे वेळी लागणारे सामान ठेवले जात असे.
                 दगडी कमानीतून आत जाताच मोठा चौक लागत असे. चौकाच्या पूर्वेला धान्याचे गोदाम होते. गोदामाबाहेरच्या व्हरांड्यात खाद्य तेलाच्या टाक्या भरून ठेवलेल्या असत. चौकात लहान मुलं अनेक प्रकारचे खेळ खेळत असत. चौकाच्या पश्चिमेला वाड्याचा दिवाणखाना होता. याला ' बैठक ' असं संबोधलं जाई. गोदाम व बैठक यावर मोठ- मोठ्या माड्या होत्या. गोदामाजवळून व बैठकीजवळून या माड्यांवर जायला जिने होते. बैठकी वरील माडी बैठकी सारखीच होती.
                 बैठक ही वाड्याच्या आकर्षणाचा केद्रबिंदू होती. एैसपैस चौकोनाकृती बैठकीच्या प्रवेशाला सामान उंचीचे तीन दरवाजे होते. मधल्या दाराने  चौकातून बैठकीत जाताना तीन दगडी पायऱ्या चढून वर जावं लागे. आजू बाजूच्या दारांबहेर छोटे दगडी व्हरांडे होते. ही दारं सदैव निळ्या वार्निश पेंट ने रंगवलेली असत. दरवाजांना असणारे रंगीत काच व त्यावरील अर्धवर्तुळाकार खिडक्या त्यांना अधिकच शोभा आणत असत. बैठकीच्या मागच्या बाजूस ही सामान तीन दरवाजे होते, पैकी फक्त एक दार मागे पश्चिमेकडील गोठ्यात उघडत असे बाकीचे दोन कपाट होते. उंचावराती पणजोबा व त्यांच्या दोन भावांच्या तसबिरी व मोठे दोन आरसे कायम अडकवलेले असत. दारांप्रमाणे  बैठकीचे छत देखील निळे रंगवलेले असे, त्यावर मोठे झुंबर, काचेच्या रंगीत हंड्या टांगलेल्या असत. मोठमोठाले जाजम, नक्षीदार गालिचे, स्वच्छ पांढरे अभ्रे घातलेले लोड व तक्क्यांनी सुशोभित बैठक सदैव पै पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार असे. सणावाराला बैठकीचे रूप अधिकच खुलून येई, दसऱ्याला शस्त्रास्त्र पूजा असो वा दिवाळीला लक्ष्मीपूजन, तो मान बैठकीचा. त्यावेळी मधल्या दराबहेरील खांबांना नारळाची पानं,केळीचे खांब लावून सजवल जात असे. अशा या नीट नेटक्या, सणावारात अधिकच नटणाऱ्या , पाहुण्या - राहुण्यात  रमणाऱ्या बैठकीत आप्त स्वकियांच्याच काय पण गल्लीतल्या, ओळखीतल्या अनेकांच्या संसाराचा श्री गणेशा देखील लिहिल्या गेला होता. म्हणूनच बैठक म्हणजे मोठ्या आजोबांच्या  जिव्हाळ्याचा  विषय होती.
                 मोठ्या चौकातून आत मुख्य घरात जाताना तीन दगडी पायऱ्या, एक भक्कम असे दार व आजूबाजूला व्हरांडे असलेली एक संरक्षक भिंत लागत असे. या दाराला ' मधले दार ' म्हणत असत. आत प्रवेश करताच एक छोटे अंगण लागत असे. शेणाचा सडा घातलेल्या या पिवळ्या सोनेरी अंगणात पहाटे सुरेख रांगोळी रेखाटलेली असे. अंगणाला लागूनच थोडा खोल असा छोटा चौक होता अन् या दोहोंच्या सभोवती काहीशा उंचीवर एकमेकींना काटकोन करणाऱ्या सलग अशा तीन ओसाऱ्या. अंगणातून २-२ पायऱ्या चढून पूर्व व पश्चिम ओसरीवर जाता येत असे व चौकातून मधल्या ओसरीवर. 
                 पश्चिम ओसरीवर दोन दरवाजे उघडत असत, एक स्वयंपाक घराचे व दुसरे कोठी घराचे. स्वयंपाक घरात जाळीचे दार असलेली एक छोटी खोली होती, यात सोवळ्या चे पाणी भरून ठेवले जात असे. विरुद्ध दिशेला कोठी घरात जायला देखील एक दार होते. स्वयंपाक घरात सोयीनुसार बसून अथवा उभ्याने स्वयंपाक करण्यासाठी दोन वेगवेगळे ओटे होते. उभ्या ओट्यावर गोबर गॅस च्या शेगडी चे कनेक्शन होते. या ओट्याला लागूनच छोटी मोरी  देखील होती(त्या काळचे सिंक). भिंतीत दुधाचे जाळीचे कपाट होते. एका खांबाला मोठी लाकडी रवी सदैव बांधून ठेवलेली असे, मोठ्या बादलीत या रविनेच आजी लोणी काढत असे. ५-६ पायऱ्या उतरून खाली जाताच उजव्या हाताला मोठे प्रशस्त न्हाणीघर लागत असे. न्हाणीघरात मोठा हौद होता. बाहेरून तो भरता येईल अशी सोय देखील होती. न्हाणीघराबाहेर मोठा पाण्याचा  पितळी  बंब  गरम पाण्यासाठी ठेवलेला असे . न्हाणीघराला लागूनच भांडी घासण्यासाठी व कपडे धुण्यासाठी विशिष्ट सोय केलेली होती तसेच सहजरित्या पाणी घेता यावे यासाठी जमिनीच्या लेव्हल चा हौद बनवलेला होता. वृंदावनाच्या बाजूला मोठा असा गाईचा गोठा होता व दक्षीण दिशेला गोबर गॅसचे मोठे टाके होते . 
              याच ओसरीवर स्वयंपाक घर व कोठिघराच्या दारांच्या  मधोमध एक छोटेसे पण सुबक असे मखर बनवलेले होते. गौरी गणपतीच्या काळात ज्येष्ठा - कनिष्ठ गौरी तिच्या दोन्हीं बाळांसह ऐसपैस बसतील व पूजा करणाऱ्यालाही  काही अडचण जाणार नाही या विचाराने ते बनवले होते. 
              पश्चिम ओसरीवर दोन प्रशस्थ खोल्यांची अशी एक माडी होती, त्यातील एका खोलीत मोठ मोठाली भांडी ठेवलेली असत म्हणून तिला 'भांड्यांची माडी' म्हांटल जाई व दुसऱ्या खोलीत उन्हाळ्यात आंब्याचा माच घातला जाई म्हणून तिला 'आंब्याची माडी' असे नाव होते. याच ओसरीवर कोठिघर संपताच बैठकीला लागून जिना होता, तो भांड्याच्या माडीत  व बैठकी वरील माडीत जात असे. या ओसरीवर सागवानी  बंगई सदैव टांगलेली असे व कोपऱ्यात ठेवणीतल्या लोटी पेल्यांसाठीचे कपाट देखील असे.
                पश्चिम ओसरीच्या दुसऱ्या टोकाला स्वयंपाक घराला लागूनच मोठे प्रशस्त देवघर होते. त्याला सुंदर नक्षीदार कमान अन् जाळीचे लाकडी दार होते. देवघरात एक मोठा लाकडी देव्हारा होता. त्यात तांब्या-पितळेच्या सिंहासनावर विराजमान सोन्या-चांदीच्या देवाच्या प्रतिमा ठेवलेल्या असत. एक मोठा सुंदर शाळीग्राम असे चांदीचा मोठा महादेव तसेच पणजीच्या लग्नातील घडीव मोठा बाळकृष्ण, अन्नपूर्णा व मंगळागौर देखील असे देव्हार्याला सुंदर चांदीचे छत्र लावलेले असे. दोन मोठ्या पितळी समया अखंड तेवत असत. देवघरातील  हळदी कुंकवाचे तबकही  मोठ-मोठ्या पितळी डब्यांचे होते व पराती  एवढे तांब्याचे भलेमोठे संध्या पात्र देखील होते. हे मोठे देवघर व मोठे देव या देवांची पूजा करण्यासाठी नेहमीचेच असे नेमलेले पुजारी काका होते .
                देवघराला लागून जी ओसरी होती तिला मधली ओसरी म्हंटले जाई. या ओसरीवर 'माज घर' व 'लोणच्याच्या खोलीत' उघडणारे असे दोन दरवाजे होते. माज घरातूनच 'उतरंडीच्या खोलीत' जायला रस्ता होता. येथे  बी बियाणे साठवण्यासाठी सुगड्यांच्या उतरंडी भरून ठेवलेल्या असत. म्हणून या खोलीला 'उतरंडीची खोली' असे नाव पडले होते येथे भलीमोठी तिजोरी ठेवलेली असे. तिजोरी फार अवजड असल्याकारणाने तिला हलवण्यासाठी सात आठ माणसं लागत असत. तिचे कुलूपही फार मोठे व जड होते. लहानांना ती उघडता येत नसे. मधल्या ओसरीवर देवघराजवळ एक मोठी गजाची खिडकी होती. तसेच मोठाले कोनाडे देखील होते. या कोनाड्यात गणेशोत्सवात संगमरवरी गणेश मूर्तीची स्थापना केली जाई पण एरवी वर्षभर ती गणेश मूर्ती गौरीच्या सामानासोबत उचलुन ठेवली जात असे. या ओसरीवर दोन लाकडी ऐस पैस पाय पसरून बसता येतील अशा आराम खुर्च्या ठेवलेल्या असत.या ओसरीवरील माडीला 'मिरच्यांची माडी' म्हणून ओळखलं जाई. या माडीत जायला उतरंडीच्या खोलीतून एक अरुंद असा लाकडी जिना होता.
               पूर्वेकडील ओसरी वरून दोन विशिष्ट खोल्यांमध्ये जायला दारं होती. एक 'बाळंतिणीची  खोली' व दुसरी 'विटाळाची खोली'. एवढ्या मोठ्या गोतावळ्यात कोणीतरी बाई बाजूला बसलेली असे किंवा कोणाचे तरी मुल तान्हे असे म्हणून असे प्रयोजन.या ओसरीवर मोठा लाकडी पाळणा टांगलेला असे व एका कोपऱ्यात जमिनीत रोवलेले उखळ व मोठा दगडी खलबत्ता ठेवलेला असे. ओसारीच्या दुसऱ्या टोकाला गोदामाला लागून जाणारा जिना होता. हा जिना गोदामा वरील माडीत जात असे. या ओसरीला सलग रेषेत असे पण मधल्या ओसरीला काटकोन करणारे  एक दार होते. ते दार 'आडाकडे' जाई. इथे एक निमुळत्या तोंडाची विहीर होती म्हणून या पूर्ण जागेलाच 'आड ' असे नाव पडले होते. इथे न्हाणीघर, एक मोठा हौद, पाणी तापवायला चूल, कपडे धुण्याचा मोठा दगड असे सगळे नियोजनबद्ध केले होते. पूर्व ओसरी व आड यांच्यावर जी माडी होती तिला ' जात्याची माडी ', असे म्हटले जाई. इथे छोट्या मोठ्या आकाराचे अनेक जाते ठेवलेले असत, या माडीवर जायला आडातून जाणारा एक छोटा अरुंद असा जिना होता. या जिन्यात कायम अंधार असे म्हणून दिवसासुद्धा या जिन्यातून जाण्याची भीती वाटत असे. जात्याच्या मांडीतून गोदामावरल्या माडीत जायला एक छोटेसे दार होते. 
               मधलं दार व आतलं अंगण यावर दारं खिडक्या नसलेली, फक्त लाकडी खांब व छप्पर असलेली अशी एक माडी होती. तिला ' उघडी माडी ' म्हणत असत. बैठकीवरल्या माडीतून व जात्याच्या माडीतून उघड्या माडीत जायला रस्ता होता. कधी कपडे वाळवण्यासाठी, कधी जास्तीचे सामान ठेवण्यासाठी तर कधी अडगळीसाठी म्हणून या माडीचा वापर होत असे.
               तीनही ओसऱ्यांच्या छताला सागवानी लाकडाचे माळवद होते, तसेच सर्व खोल्यांना देखील होते. वर्षातून दोनदा माळवदाला तेल दिले जाई, यामुळे कीड वाळवी लागायची भीती नसे. ओसऱ्यांवरील माळवदावर सरळ अशी लोखंडी पत्रे होती, वाळवणासाठी या जागेचा उपयोग केला जाई. वरच्या सर्व माड्यांना थोडे तिरपे असे पत्राचे छप्पर होते, पावसाळ्यात सर्व पात्रावरचे  पाणी पन्हाळी तून गोळा होऊन एकत्रितरित्या लहान चौकात पडत असे. या पाण्यात भिजायला आम्हा बहीण भावांना  फार मजा वाटत असे.
            वाड्याला मुख्य पाणीपुरवठा हा वड्या बाहेर असणाऱ्या एका विहिरीतून होत असे, आडाला फारसे पाणी नसल्यामुळे ते तिथल्या वापराकरीता  व सोवळ्याचे म्हणून भरण्याकरिता घेतले  जाई. वाड्यातील सांडपाण्याचा निचरा हा तीन वेगवेगळ्या मार्गाने होत असे. पूर्वेकडील व आडाकडील सांडपाणी हे थेट त्या बाजूला असणाऱ्या वाड्याबहेरील मोकळ्या जागेत सोडले जाई, स्वयंपाकघर व मोठे न्हाणी घर येथून येणारे पाणी मागच्या अंगणातील मोठ्या नालीत गोळा होत असे त्याचबरोबर चौकात पडणारे पाणी, बैठक व त्यासमोरील चौकतले पाणी हे भूमिगत नाल्यांमधून अंगणातल्या त्याच मोठ्या नालीत सोडले जाई व तिथून  गोठ्यातल्या मोठ्या नालीतून थेट वाड्याबाहेर टाकले जाई.
            वाड्यात ठिकठिकाणी म्हणजे खोल्यांमध्ये, ओसऱ्यावर, माड्यांमध्ये कपडे किंवा अजून काही अडकवण्यासाठी लाकडी खुंट्या ठोकलेल्या होत्या, व रोजचे ओले कपडे वाळविण्यासाठी तीनही ओसऱ्यांवर, उघड्या माडी त लांब बांबू टांगलेले होते. त्या काळी विजेची बटणं  गोल व लाकडी होती अन् वायर फिटींग देखील लाकडी पट्ट्यांमध्ये केलेले होते. साधारण १९६८ साली वाड्यात वीज आली होती पण त्यापूर्वी उजेडासाठी खाद्य तेलाचे दिवे, टेंभे, चिमण्या, काचेचे लॅम्प व इंग्रजकालिन कलाकुसर असलेले, छोटेसे दार असलेले लोखंडी कंदील वापरले जात.
            पणजोबांना  त्यांच्या कारकिर्दीत इंग्रज सरकारकडून बारा गावची मुखत्यारी बहाल करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना ' न्यायाधिश ' हे पद देखील मिळाले होते व असा सगळा आशय असलेला , १०८ अक्षरं कोरलेला तांदळाचा दाणा इंग्रज सरकारने त्यांना भेट म्हणून दिला होता. अगदी वैशिष्ट्यपूर्णरित्या काचेच्या काडीवर  चीटकवलेल्या, काचेच्या नळीत आवृत्त केलेल्या, बघण्यासाठी विशिष्ट भिंग असलेल्या या दाण्याला ठेवण्यासाठी एक छोटी मखमली लाकडी पेटी होती. हे सगळं बघायचं म्हणजे लहानपणी फार मोठी गंमत वाटत असे, सणावाराला तिजोरी उघडली की त्यासाठी आम्ही आजोबांजवळ  हट्ट करत असू.
            आम्हा भावंडांचे वेगवेगळ्या वयोगटातील मित्रमंडळ सदैव वाड्यावर खेळण्यासाठी येई. लपंडाव खेळतानाची गंमत तर काही औरच असे. या माडीतून  त्या माडीत घुसणे सहज शक्य असल्यामुळे कोण कुठे लपलाय याचा काही थांगपत्ता लागत नसे, राज्य देणारा बिचारा शोधून शोधून हैराण होई. सुट्ट्यांमध्ये विशेषत: उन्हाळ्यात वाडा म्हणजे सर्वांचे हक्काचे ठिकाण असे. यावरून अनेकदा आम्हाला आजोबांचा ओरडा खावा लागे.
            अनेक संतांच्या पदस्पर्शाने वाडा पावन झाला होता. राष्ट्रसंत श्री पाचलेगावकर महाराज, श्री प्रल्हाद महाराज रामदासी कित्येकदा वाड्यात येऊन राहत असत. तसेच परम पूज्य श्री भादोलकर महाराज यांचे अनेक भागवत सप्ताह वाड्यात होत असत. त्यामुळे लहान पणापासून आम्हा भावंडांना अशा संतांचा सहवास लाभला होता, वाड्यात एकप्रकारे गोकुळच नांदत होते .
            पणजोबांच्या वडिलांनी १८ व्या  शतकात वाडा बांधला होता. पणजोबा अल्पायुषी होते, आपलं उरलेलं आयुष्य जणू काही ते आपल्या सहचारिणीला हा डोलारा सांभाळण्यासाठी बहाल करून गेले होते आणि त्यांच्या पश्चात पाच मुली, तीन मुलं अन् इतर सर्व गोतावळा तिने तितक्याच निगुतीने सांभाळला होता, फक्त सांभाळलाच नव्हता तर मस्तपैकी स्वतः वर सोन्याची फुलं उधळवून घेत तुपाच्या परातीत पतवंडाचं तोंड बघून वयाच्या ८७ व्या वर्षी त्या माऊली ने समाधानाने डोळे मिटले होते. तीच्यानंतर तिच्या तीन मुलांनी  ही परंपरा पुढे चालवली. मोठे आजोबा फार शिस्तीचे व रुबाबदार होते, त्यांचा वेगळा रुतबा होता. मोठी आजी अतिशय संयमी, समाधानी व शांत होती. आधुनिक विचारांचे मधले आजोबा शेती व इतर उद्योग सांभाळत, मधली आजी फार देवभोळी होती, देवाची अनेक स्तोत्रे व आरत्या तिने स्वतः लिहिल्या होत्या, लहान आजी आजोबा देखील सदैव हसतमुख व आनंदी असे होते. या सर्वांमुळे वाड्यात मंदिरा सारखे मांगल्य नांदत असे.
            असा हा वाडा म्हणजे उत्कृष्ट वास्तू कौशल्याचा एक नमुनाच होता. प्रथमदर्शनी दिसणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कलाकुसर युक्त खिडक्या व कमानी मोठ्या दाराला अधिकच शोभा आणत असत. चौकात प्रवेश करताच दिसणारी बैठक - तश्शीच त्यावरील माडी , गोदाम - त्यावरील माडी व या दोन्हींवर जाणारे जिने म्हणजे मधल्या दाराला अक्ष ठेऊन काढलेल्या एखाद्या फ्री हॅण्ड ड्रॉइंग प्रमाणे वाटत असे, आत प्रवेश करताच लागणारे अंगण, चौक, ओसऱ्या देवघर पाहून एखाद्या मंदिरात प्रवेश केल्याचा फिल येत असे, पूर्वेकडून उगवणाऱ्या सूर्याची किरणं बरोब्बर देवघरावर पडत असत, मिरच्यांच्या खोलीत दिवसभर वारा व ऊन खेळता असे तर बाळंतिणीची खोली ही दिवसभर ऊब देणारी असे. माळवदाचे छत असल्याने वाडा हा उन्हाळ्यात गार व हिवाळ्यात उबदार राहत असे. सगळीकडून तटबंदी करणाऱ्या भिंतींची रुंदी म्हणावी तर एखादा सहफुटी माणूस सहजरीत्या झोपू शकेल एवढी. अशी एकूणच रचना असलेली ही वास्तू  म्हणजे त्या काळातही अतिशय विचारपूर्वक बांधलेली उत्कृष्ट कलाकृती होती.
            काही काळासाठी का होईना वाड्यात चार पिढ्या एकत्र नांदल्या, अनेक संतांचा सहवास लाभल्याने वाड्याला विशेष पावित्र्य प्राप्त झाले, वाड्याने अनेकांना आसरा दिला, अनेकांचे संसार फुलविले अन् कित्येकांचे करीयर घडविले. वाड्याने सर्वांना स्वतः मध्ये सामावून घेत अनेक चालीरीती रुजविल्या. वाड्याने जसे सोहळे उत्सव पाहिले तशा काही अप्रिय घटना देखील पाहिल्या अन् काळाच्या ओघात हळूहळू तोही नाहीसा होत गेला. तरीसुद्धा, आजही माझ्या व माझ्यासारख्या अनेकांच्या मनात तो डौलानं उभा आहे, ते वैभव ती समृद्धी आम्ही मनात साठवून ठेवली आहे.
            आजही दिवाळीला शे - पाचशे दिव्यांनी उजळलेला वाडा मला दिसतो, दसऱ्याला बैठकीत मांडलेली शस्त्रात्रं  पूजा व लोडाला टेकून बसलेले आजोबा मला दिसतात, बळी-राण्याचा वध करताना बाबा, काका दिसतात. सगळ्या माड्यांमधे लपंडाव खेळत फिरणारे आम्ही भावंडं दिसतो, लग्ना कार्यात पुढे होऊन कामं करणाऱ्या आत्या दिसतात व त्यांना सूचना करणारी सुरकुतलेली आत्याआजी दिसते. हसत खेळत मखरा मध्ये गौरी गणपतीची आरास करताना आई काकवा दिसतात. आजही तुळशीची पूजा करतानाचे आजीचे " सोन्याच्या तुळशी मोत्याच्या मंजुळा भावे घालू गळा श्रीगुरूंच्या, आता काय उणे आमुचे कुटुंबा बैसलीसे अंबा वृंदावणी " हे बोल माझ्या कानी ऐकू येतात. आजही आजीने श्रावणात पारिजातकाची  लाखोळी वाहिलेला मोठ्या देवघरातील बाळकृष्ण मला दिसतो व तो सुगंध माझ्या मनाला दरवळून  टाकतो. असे गोकुळ फुलविणारी  ती ' सुखवास्तू ' आजही माझ्या मनात तशीच जिवंत आहे. तिच्या आठवणीत अनेकदा डोळे पाणावतात पण त्याहीपेक्षा तिथे आपण घडलो, वाढलो, ती श्रीमंती जगलो या भावनेनं उर अभिमानानं भरून येतो. पण एक मात्र खरे की तिची सर आजकालच्या ३-४-५ बी एच के फ्लॅट्स ना किंवा टुमदार बंगल्याला येणे नाही!!!!

प्राजक्ता  राजदेरकर
टीप : १९९९ साली काढलेले वाड्याचे काही फोटो वरीलप्रमाणे 

Post a Comment

0 Comments