मराठवाड्याला हवाय एक जामयांग शेरींग

Rajmudra IT - Motivation


आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवलाय... कुठे पुराने थैमान घातलेय तर मराठवाड्याच्या काही भागात शेतकऱ्याने ओटी भरून ठेवलेली काळी आई पावसाच्या थेंबा थेंबाला तरसतेय... असे असताना सगळेजणं राज्यात होऊ घातलेल्या निवडणूकांसाठी लंगोटांचे बंद आवळू लागले आहेत. ज्याभागात पुर आलाय त्यांच्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत पोहोचवा, असे आदेश मुख्यमंत्र्यानी दिलायं आणि त्यासाठी यंत्रणाही कामाला लावली आहे. मात्र अवर्षणग्रस्त भागाचं काय? कुठे गेले ते कृत्रिम पावसाचं विमान आणि त्यासाठी केलेल्या निधीची तरतूद ?...... या प्रश्नांचं उत्तर कुठेही मिळाणार नाही. कारण त्यासाठी आवश्यक असलेले ''गाईड'' मराठवाड्याच्या मातीत अस्तित्वातच नाहीत. हे गाईड म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही तर येथील राजकीय नेतृत्व आहे.
       आज हे लिहीण्याचं कारण म्हणजे संसदेत लद्दाखसारख्या दुर्गम भागातील एक अवघे ३४ वय असलेला खासदार जामयांग शेरींगने मांडलेली भूमिका. आज जामयांग सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. विशेषत: राजकीय समर्थकांच्या वॉलवर त्याला आवर्जून स्थान मिळाले आहे. या तरूण खासदाराने ज्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक शैलीत लद्दाखचे प्रश्न मांडले ते पाहून मराठवाड्यालाही असा जामयांग शेरींग नामग्याल हवा आणि त्याने संसद, विधिमंडळात सर्वसामान्यांचे हाल मांडावेत असेच आता वाटू लागले आहे. मराठवाड्याला सुदैवाने शंकरराव चव्हाण, बापुसाहेब काळदाते, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांसारख्या दिग्गज लोकनेत्यांचा वारसा आहे. मात्र आज हा वारसा केवळ सांगण्यापुरता उरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील तरुण आमदार प्रशांत बंब यांनी मराठवाड्याच्या पाण्यासाठी आवाज उठवून प्रश्न पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न एकाकी ठरला. पन्नासावर आमदार असताना एकटे बंब पेटतात आणि एकट्याचा आवाज बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचत नसतो हे आपण सगळेच जाणतो. सत्तेतील आणि विरोधी पक्षांतील आमदारही या प्रश्नावर एकत्र येत नाहीत, हीच मराठवाड्याच्या विकासाची, पाण्याची खरी समस्या आहे. आज पश्चिम महाराष्ट्र, नाशिकजिल्ह्यातील पावासाने मराठवाड्याच्या काही भागाचा पाणीप्रश्न मिटला आहे. मात्र लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाण्याचं काय ? लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याचा प्रस्ताव ठेवल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली. मात्र केवळ लातूरला रेल्वेने पाणी आणण्यासाठीच रेल्वेबोगी निर्मिती प्रकल्प त्यांनी लातूरला आणला का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लातूर शैक्षणिक दृष्ट्या प्रगत शहर आहे. येथे गुणवत्तेची कमी नाही. पण हाताला काम नसल्यानं सगळे तरुण लोंढे बाहेर जात आहेत. याशिवाय मोलमजूरी करणारी असंख्य कुटुंबेही स्थलांतरील होत आहेत. अख्खं पुणं मराठवाड्यातल्या लोकांनी भरलंय त्यात अर्धाधिक वाटा लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा आहे.  कामगाराअभावी शेती ओस पडतेय तर रोजगाराअभावी तरुण स्थलांतरीत होतोय. स्थलांतरीत होणारा तरुण हा काही कुशल कामगार नाही. मात्र पाण्याअभावी मरणासन्न एमआयडीसी पाहाता, या तरुणांकडे पर्याय काय? हा प्रश्न आहे.
मराठवाड्याची ही स्थिती बदलायची असेल तर पाणी प्रश्न सर्वात आधी मिटणे आवश्यक आहे. प्यायला पोटभर आणि शेतीला किमान पाणी तरी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. सध्या सरकारने पश्चिम वाहीनी नद्या मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात यायला किती वर्षे लागतील हे काळालाच माहिती. किमान तो कालावधी तरी सरकारने जाहीर करावा म्हणजे सुनसान गावांना किमान वाडी- तांड्यांचे तरी स्वरूप राहील अन्यथा जसे परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्राच्या संपन्न भागात येताहेत तसे लोंढे अन्य राज्यात जातानाचे चित्र पहायला मिळेल आणि अनेक गावे सरकारी योजनांप्रमाणे केवळ कगदोपत्रीच उरतील.

(टीप : मी काही या प्रश्नाचा गाढा अभ्यासक वगैरे नाही. मात्र रोज जे छापतो, वाचतो, पाहतो आणि भोगतो त्याचीच ही छोटीशी अभिव्यक्ती आहे. त्यामुळे विनाकारण कोणी वैयक्तिक होऊ नये.)

कोण आहे जामयांग?
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविले. यासंदर्भात संसदेत सुरु असलेल्या चर्चेत जामयांगने तुफान फटकेबाजी करताना विरोधकांचे वाभाडे काढले. ४ ऑगस्ट १९८५ ला लेहच्या मथूआ गावात जन्मलेला जामयांग देशातल्या भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या असलेल्या लोकसभा मतदारसंघांतून लोकसभेवर निवडून आला आहे. जामयांग ''लद्दाख अटॉनमस हील डेवलपमेंट काऊन्सील''चा आठवा ''चीफ एक्झीक्यूटीव्ह काऊन्सीलर'' म्हणून ९ नोव्हेंबर २०१८ला निवडून आला. या पदावर पोहोचणारा तो सर्वांत तरुण व्यक्ती ठरला. स्टेन्झीन दोरजी आणि श्रीमती इ्शेय पूटीत यांच्यापोटी जन्मलेला जामयांग जेटीएन नावाने सुपरिचित आहे. त्याने केंद्रीय बोर्डाच्या बुध्दीस्ट स्टडीज्मधून बारावी उत्तीर्ण केली. त्यानंतर जम्मू विद्यापीठातून त्याने पदवी मिळवली. राजकारणात येण्यापूर्वी त्याने ऑल लडाख स्टुडण्ट असोसिएशन, जम्मूसाठी अनेक पर्षे काम केले. या संघटनेचे अध्यक्षपद २०११-१२ पासून त्याच्याकडे होते. भाजपातून राजकारण प्रवेश केल्यानंतर तो लद्दाखचे खासदार थूपस्थान छेवांग यांचा खासगी सचिव झाला. त्यानंतर त्याने ''लद्दाख अटॉनमस हील डेवलपमेंट काऊन्सील''ची २०१५मध्ये मोर्टसेलांग मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो विक्रमी मतांनी निवडून आला. त्यानंतर तो या काऊन्सीलचा अध्यक्षही झाला. भाजपने त्याला लद्दाख मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले आणि तो १७व्या लोकसभेचा सदस्य बनला. त्याच्या लोकसभेतील कलम ३७० वरील भाषणानंतर तो समाजमाध्यमातून प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. मात्र त्याने ज्या प्रखरपणे लद्दाखची बाजू मांडली ती खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे. तो केवळ ३७० कलमावर बोलत असल्याने लद्दाख आणि तिथल्या समस्यांबद्दल त्याला अधिक बोलता आले नाही, मात्र तो त्या नक्की मांडेल आणि सोडवेल अशी तडफ त्याच्यात दिसली. जामयांगचे २०१३मध्ये ''अ गिफ्ट ऑफ पोएट्री'' हा कवितासंग्रह प्रसिध्द झाला आहे. त्या शिवाय ''स्वायत्ततेचे लद्दाखवर होणार परिणाम'' आणि इतर काही लेख त्याने लिहीले आहेत.
सौजन्य : थोडक्यात मनातलं फेसबुक पेज

Post a Comment

0 Comments